अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.
या चौकशी प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर यावर तुम्ही प्रश्नचिन्ह कसं उपस्थित करू शकता? असा प्रश्न न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या पीठानं न्यायमूर्ती वर्मा यांना विचारला. न्यायमूर्ती वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोख रक्कम आढळल्याप्रकरणी ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर न्यायमूर्ती वर्मा यांना पदावरून हटवण्याची शिफारस तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केली होती. या दोन्ही गोष्टींना न्यायमूर्ती वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या बुधवारी ३० जुलैला होणार आहे.