इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गंत अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गंत आज अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी करण्यात आली. असा प्रयोग करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे. या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं आणि संशोधकांच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं आहे. इस्रोनं मिळवलेलं हे यश आगामी अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.
इस्रोच्या संशोधकांनी साध्य केलेलं यश हे अतिशय अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली. अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी करण्याचं हे तंत्रज्ञान संपूर्ण स्वदेशी बनावटीचं असल्याचं सिंह यांनी नमूद केलं. हे तंत्रज्ञान भारतीय अंतराळ स्थानक, चंद्रयान ४ आणि गगनयान या महत्त्वाकांक्षी मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी म्हटलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.