सर्व शैक्षणिक संस्था, रुग्णालयं, सार्वजनिक क्रीडा संकुलं, बसस्थानकं, रेल्वेस्थानकं इत्यादी ठिकाणी भटकी कुत्री येऊ नयेत, यासाठी व्यवस्थित कुंपण घालण्यात यावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. भटके कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही बाब काळजी करण्यासारखी असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजरिया यांच्या पीठानं नोंदवलं.
या सर्व ठिकाणांवरून भटकी कुत्री हटवण्याची आणि त्यांचं लसीकरण आणि निर्बीजीकरण करून त्यांना आश्रय केंद्रांमध्ये हलवण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याचंही न्यायालयानं सांगितलं. या ठिकाणांवरून उचललेली भटकी कुत्री पुन्हा त्याच ठिकाणी सोडण्यात येऊ नयेत, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.