महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची पाहणी

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा केवळ पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत राजकोट किल्ल्याला भेट दिली. त्यापूर्वी वार्ताहरांशी संवाद साधताना पाटील बोलत होते. 

पुतळा बनवण्याचं काम अपरिपक्व माणसाला दिलं होतं, याची जबाबदारी सरकारला झटकता येणार नाही, असं पाटील म्हणाले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. पुतळ्याचे शिल्पकार आणि बांधकाम सल्लागार यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यावरही पाटील यांनी टीका केली. सरकारने कोणतीही शहानिशा न करता गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल करून काहीतरी कारवाई केली असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करत असल्याची टीकाही त्यांनी केली. याप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याची मागणीही पाटील यांनी केली.