डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 15, 2024 7:23 PM

printer

उन्हाळी सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा पुन्हा सुरू

उन्हाळी सुट्टीनंतर आज राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा पुन्हा सुरू, विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांचं स्वागत
उन्हाळी सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा मुलांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
मुंबईत वरळी इथल्या महानगरपालिकेच्या शाळेत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्याशी संवाद साधला. ‘विद्यार्थी प्रवेश पाडवा’ आणि ‘पहिले पाऊल’ या उपक्रमांचा प्रारंभही त्यांच्या हस्ते झाला. पुण्यातल्या न्यू इंग्लिश मीडियम शाळेत मोबाईलचा अतिवापर करणार नाही, ‌निकृष्ट अन्न खाणार नाही, प्लास्टिक साहित्याचा वापर टाळू‌, ‌नियमित व्यायाम करू, ‌मैदानी खेळ खेळू‌, ‌शुभंकरोती म्हणू अशी प्रतिज्ञा करीत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी वासुदेवाच्या झोळीत दान टाकलं.
लातूर शहराजवळ वरवंटी इथल्या शाळेत विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं.
रत्नागिरी मधल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर औक्षण करून, फुलं आणि लाडू देऊन मुलांचं स्वागत करण्यात आलं. तर हिंगोली मध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांच गुलाबपुष्प आणि रोप देऊन स्वागत केलं. धुळे शहर आणि जिल्ह्यात शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांचं स्वागत आणि पाठ्यपुस्तकाच्या वितरणानं उत्साहात झाली.