प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्टार्ट अप महोत्सवाचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं स्टार्ट अप महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. स्टार्ट अप संकल्पना कार्यान्वित झाल्याच्या दशकपूर्तीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. १६ जानेवारी २०१६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा प्रारंभ केला होता. नवोन्मेषाला चालना, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि गुंतवणूक-आधारित विकास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आजपर्यंत भारतात दोन लाखांहून अधिक स्टार्टअप्सना मान्यता मिळाली आहे. २०१४ नंतर दीड लाखापेक्षा जास्त नवीन उपक्रम सुरु झाले, सुमारे साडे १७ लाख रोजगारनिर्मिती झाली असून, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था ठरला आहे.