प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या करूर इथल्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले.
तामिळनाडूत करूर इथं गेल्या २७ सप्टेंबरला विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम- TVK पक्षाच्या जाहीर सभेच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयानं दिले होते. या आदेशाला TVK पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठानं हे आदेश दिले. या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीनं देखरेख करावी, असे आदेशही खंडपीठानं दिले आहेत. या समितीत तामिळनाडूचे रहिवासी नसलेल्या २ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असावा असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.