खेळामुळे शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना वाढते, खेळात लोक, विविध प्रदेश आणि देशांना जोडण्याची अद्वितीय शक्ती असते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं ड्युरँड चषक २०२५ या फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचं अनावरण झालं. त्यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केलं. भारतात खेळ हे कायमच राष्ट्रीय एकात्मतेचं एक सामर्थ्यशाली माध्यम राहिलं असल्याचं त्या म्हणाल्या. फुटबॉल हा रणनीती, सहनशीलता आणि परस्पर सामाईक ध्येयासाठी सांघिक भावनेचं दर्शन घडवणारा खेळ असल्याचं त्या म्हणाल्या. ड्युरँड चषकासारख्या स्पर्धांमुळे खेळ भावना वाढण्यासोबतच, नव्या खेळाडूंच्या जडणघडणीसाठी व्यासपीठही उपलब्ध होतं असं त्या म्हणाल्या. सशस्त्र दलं ही स्पर्धा टिकून ठेवत तिचा वारसा पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात असल्याचंही त्यांनी सांगितलं.