ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचं निधन

ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते १०० वर्षांचे होते. इस्रोच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. डॉ. होमी भाभा यांच्यासह भारतीय अवकाश कार्यक्रमाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो. देशातला इन्सॅट हा पहिला दूरसंचार उपग्रह बनवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. श्रीहरीकोटा आणि थुंबा इथल्या प्रक्षेपण केंद्राची जागा निवडण्यात त्यांनी पुढाकार घेतला. १९७० च्या दशकापासून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे १९९० च्या दशकात देशात खेडोपाडी टीव्ही पोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.