महाराष्ट्रात नैर्ऋत्य मान्सून पावसानं चांगलाच जोर धरला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राजधानी मुंबईत काल रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. राज्य सरकारनं जारी केलेल्या पत्रकानुसार, गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजे २९ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस मुंबई उपनगर जिल्ह्यात झाला आहे. त्याखालोखाल रायगडमध्ये जवळपास २२ मिलिमीटर, तर पालघरमध्ये २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर ओसरला असला, तरी धरणातल्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगेची पाणीपातळी वाढत आहे. धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
हवामान विभागानं आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मात्र सध्या तरी यापैकी कुठंही जोरदार पावसाचं वृत्त नाही.
उद्या या जिल्ह्यांसह पालघर जिल्ह्यालाही हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यात इतर ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.