सोमनाथ सूर्यवंशी यांचा परभणीत कोठडीत असताना मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई विजयाताई सूर्यवंशी यांनी याबद्दलची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठानं आज हे निर्देश दिले.
दरम्यान न्यायालयानं या निर्देशातून सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचं मान्य केलं असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी सुर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायालयानं हा दावा फेटाळला, तसंच सुर्यवंशी यांच्या आईंनी दाखल केलेल्या अर्जाच्या आधारेच गुन्हा दाखल करावा असे निर्देश न्यायालयानं दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. हा या प्रकरणातला मोठा विजय असून, आपण अखेरपर्यंत हे प्रकरण लढू असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.