डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 16, 2025 10:19 AM | shubhanshu shukla

printer

देशभरातून शुभांशू शुक्ला यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ॲक्सिओम फोर मोहिमेतले त्यांचे तीन सहकारी काल सुखरूप पृथ्वीवर परतले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून त्यांना घेऊन निघालेलं स्पेस एक्सचं ड्रॅगन अंतराळ यान  कॅलिफोर्नियात पॅसिफिक महासागरात उतरलं. हे अंतराळवीर आता पृथ्वीवरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याकरता 7 दिवस विलगीकरणात राहणार आहेत. 18 दिवसांच्या अंतराळ मुक्कामात शुक्ला यांनी भारतासाठी 7 वेगवेगळे प्रयोग केले आहेत.

 

ॲक्सिओम फोर मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून पृथ्वीवर परतल्यानंतर काल देशभरातून शुभांशू शुक्ला यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रुप कॅप्टन शुक्ला यांचं समाज माध्यमावरुन अभिनंदन केलं. ही मोहीम भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीतील मैलाचा दगड ठरला आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत केलं; शुक्ला यांची कामगिरी देशाच्या गगनयान मोहिमेतील पुढचं पाऊल असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. अंतराळ स्थानकात गेलेल्या भारताच्या सुपुत्राचं पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन ही अभूतपूर्व घटना असल्याची प्रतिक्रीया केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. ग्रुप कॅप्टन शुक्ला पुनर्वसन कार्यक्रमानंतर 17 ऑगस्टच्या सुमाराला मायदेशी परतण्याची शक्यता असल्याचं त्यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं.

 

शुभांशू शुक्ला सुखरूप पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी लखनौ इथं आनंदोत्सव साजरा केला. देशभरात अनेक ठिकाणी या घटनेबद्दल जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही समाज माध्यमावर शुभेच्छा संदेश दिले.