भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचं आज लखनऊ इथे त्यांच्या मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आलं. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि लखनऊच्या महापौर सुषमा खरकवाल यांनी त्यांचं लखनऊ विमानतळावर स्वागत केलं.
शुभांशु यांनी त्यांच्या शाळेत आयोजित केलेल्या विजयी संचलनात सहभाग घेतला, त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. या संचलनावेळी शाळकरी मुलांनी तसंच स्थानिकांनी शुक्ला यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि तिरंगी झेंडे फडकावले. आज संध्याकाळी उत्तर प्रदेशच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने आयोजित केलेल्या समारंभात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शुभांशु शुक्ला यांचा सत्कार करण्यात येईल.