शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती जाहीर

शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाल्याची घोषणा शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज केली.

 

मुंबई इथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांत सामान्य माणसासाठी तसंच गोरगरीब, शोषित आणि वंचितांसाठी आपल्या सरकारने विविध योजना सुरू केल्याचं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आपल्या सरकारने केलेलं काम पटल्यामुळेच रिपब्लिक सेना आपल्याबरोबर असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले. 

 

दोन्ही पक्षांची युती ही बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून चालत आली आहे. कोणत्याही अटी शर्तींशिवाय ही युती होत असून आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घ्यावं, अशी विनंती आपण शिंदे यांना केल्याची प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी दिली.