काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर यांचं आज पहाटे लातूर इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत ढासळली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पाटील यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदासह केंद्र सरकारमधील अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. ते लातूर मतदारसंघातून सात वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. समाज माध्यमावरील संदेशात प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे की, पाटील हे एक अनुभवी नेते होते. ते समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्यास खूप उत्सुक होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. पाटील हे महाराष्ट्राच्या राजकीय मूल्यांना जपणारे आणि त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उंचावणारे एक प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत नेते होते असं मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता लातूर शहराजवळच्या वरवंटी इथं अंत्यसंस्कार करण्यात येतील.