राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झालं. ते ६५ वर्षाचे होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी तरुण वयातच नेतृत्व गुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करीत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा प्रवास करीत ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते.
ज्येष्ठ नेते, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कर्डिले हे जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कामामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.