महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्रानं देशाचं अनेक क्षेत्रात नेतृत्व केलं आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केलं. पुण्यात बालेवाडी इथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते वितरण करण्यात आलं तेव्हा ते बोलत होते.
शिवछत्रपतींचं नाव या पुरस्काराच्या माध्यमातून खेळाडूंच्या नावासोबत लागत आहे, तेव्हा हा पुरस्कारप्राप्त खेळाडूंनी, प्रशिक्षक या सर्वांनीच आपली भूमिका ठरवून खेळाच्या आणि खेळाडूंच्या विकासासाठी आपलं पूर्ण योगदान देण्याची मानसिकता बाळगावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
सर्वच पुरस्कारार्थींनी त्यांच्या खेळावरचं प्रेम, मेहनत आणि क्रीडा कौशल्याने क्रीडा क्षेत्राचा आणि देशाचा गौरव वाढविला आहे. बॅडमिंटन पटू व उत्तम खेळाडूंच्या पिढ्या घडविणारे उत्तम प्रशिक्षक म्हणून प्रदीप गंधे आणि कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ही आनंदाची बाब आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
या कार्यक्रमात राज्यातल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.