झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी आपल्या समाज माध्यमावर शोक व्यक्त केला आहे.
सोरेन यांचं निधन हे सामाजिक न्यायाच्या क्षेत्राचं मोठं नुकसान आहे. सोरेन यांनी आदिवासींना ओळख मिळावी म्हणून आणि झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. तर, सोरेन हे आदिवासी समुदाय, गोरगरीब आणि दलितांचं सक्षमीकरण करणारे नेते होते, अशा शोकभावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी बोलून त्यांचं सांत्वन केल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे. शिबू सोरेन हे आपल्या साध्या सरळ व्यक्तिमत्त्वामुळे लोकप्रिय झाले. त्यांच्या निधनाचं वृत्त हे अत्यंत दुःखद असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोरेन यांना आदरांजली वाहताना लिहिलं की, देशातल्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असणारे सोरेन यांनी समाजातल्या दुर्बल घटकांच्या हक्क आणि सक्षमीकरणासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. सोरेन यांनी झारखंडच्या राजकारणात जवळपास पाच दशकं समर्पित भावनेनं काम केलं. त्यांच्या निधनामुळे झारखंडने एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आणि एक कुशल संसदपटू गमावल्याची भावना राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.