बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांची भूमिका मृत्युदंडाच्या विरोधातच राहील, असं त्यांच्या प्रवक्त्यांनी दैनंदिन वार्ताहर परिषदेत सांगितलं.
हा निकाल म्हणजे गेल्या वर्षी सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध झालेल्या हिंसाचार पीडितांसाठी महत्त्वाचा क्षण आहे, असं मत संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क संघटनेनं व्यक्त केलं. त्याचवेळी, शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत हा खटला चालवला जाणं खेदजनक असून त्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला संघटनेचा पूर्ण विरोध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बांगलादेशानं सत्य, सुधारणा आणि न्यायाच्या दिशेनं पुढे जावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ॲम्नेस्टी इंटरनॅशनलनं शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. हा निर्णय म्हणजे न्यायाच्या तत्त्वांचं घोर उल्लंघन असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनावेळी ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना या निकालामुळे न्याय मिळणार नाही, उलट बांगलादेशात मानवी हक्कांची परिस्थिती आणखी चिघळेल, असा इशाराही ॲम्नेस्टी इंटरनॅशनलनं दिला.