शारदीय नवरात्रौत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत असून राज्यातल्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांसह सर्वच देवी मंदिरांमधे उत्सवाची तयारी उत्साहाने होत आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रौत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून मंडपांमधे माता महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती विराजमान होत आहेत. तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, नांदेड जिल्हातल्या माहुरचं रेणुका माता मंदिर तसंच वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या एसटी आगारात भाविकांच्या सोयीसाठी पन्नास नव्या बस दाखल होणार आहेत. घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापूर-सोलापूर, तुळजापूर-धाराशिव, तुळजापूर- लातूर, तुळजापूर-कोल्हापूर आदी मार्गांवर गाड्यांच्या दररोज सुमारे दोनशे फेऱ्या होणार आहेत.