ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या मंगळवारपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. समुद्रात सध्या ताशी १०० किलोमीटर वेगानं वारे वाहत असल्यानं, मच्छिमारांनी ७ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे.
मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर,विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाडा विभागात, सात ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.