लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका गाडीत काल संध्याकाळी सातच्या सुमाराला शक्तीशाली स्फोट झाला. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
या प्रकरणाचा तपास NIA, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यायचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं आज घेतला. काल झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणातला प्रत्येक आरोपी शोधून काढण्याचे निर्देश शहा यांनी दिले. बैठकीला केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे प्रमुख, दिल्ली पोलिस आयुक्त, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक उपस्थित होते. जम्मू आणि काश्मिरचे पोलीस महासंचालक या बैठकीला दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते.
लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमाक एक इथं काल संध्याकाळी सातच्या सुमाराला झालेल्या बॉम्ब स्फोटात आठजणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले. या स्फोटानंतर शहरातील संवेदनशील ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. स्फोटामागचा सुत्रधार आणि त्या मागची कारणे शोधण्यासाठी सखोल चौकशी केली जात असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला मेट्रो स्थानक बंद ठेवल्याचं दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनं कळवलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारपर्यंत लाल किल्लाही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.