सेवा आणि सुशासन, या मंत्रानुसार काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. ‘सेवा पर्व’ या विशेष मालिकेत जाणून घेऊया गेल्या दशकात रेल्वेसेवेत झालेल्या सुधारणांची माहिती…
गेल्या दशकात भारतीय रेल्वेमध्ये अनेक पातळ्यांवर क्रांतिकारी सुधारणा झाल्या आहेत; त्यामुळे देशाची जीवनरेखा अशी ओळख असलेली रेल्वे आता देशाच्या विकासाचं केंद्र झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत रेल्वे जाळं तयार करण्यात आलं आहे.
वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत रॅपिड रेल अशा विविध रेल्वे, प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित आणि उत्कृष्ट दर्जाचा प्रवास अनुभव देत आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 1300 हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. रेल्वेच्या सुरक्षित संचलनासाठी भारतीय रेल्वेने कवच ही अत्याधुनिक स्वयंचलित प्रणाली सुरू केली आहे. तसंच भविष्यवेधी, किफायतशीर, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे योजनाही तयार करण्यात आली आहे.