देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत. आजच्या सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊ या सेमिकंडक्टर क्षेत्रातल्या प्रगतीविषयी….
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सेमिकंडक्टर हा महत्त्वाचा घटक आहे. २०२१ मधे देशात सेमिकंडक्टर मिशनला सुरुवात झाल्यापासून भारताने या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. या महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या सेमिकॉन इंडिया २०२५ या कार्यक्रमाला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेमिकंडक्टर चीपचं वर्णन डिजिटल डायमंड असं केलं होतं.
सेमिकंडक्टर मिशन अंतर्गत ७६ हजार कोटी रुपयांचे सेमिकॉन इंडिया प्रोग्राम सुरू आहेत, तर डिझाईन लिंक्ड् इन्सेन्टिव्ह स्कीमद्वारे २८० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था आणि ७० पेक्षा जास्त स्टार्टअप्सना सामावून घेतलं आहे. सेमिकॉन इंडिया २०२५ मध्ये केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीय बनावटीच्या सेमिकंड्टर चीपचा पहिला संच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सुपूर्द केला. भारताच्या सेमिकंडक्टर निर्मितीच्यचा प्रवासातला हा मैलाचा दगड ठरला. सेमिकंडक्टर क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. त्यामुळे संपूर्ण जग आज भारताकडे आशेने पाहत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.