प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सुरु करण्यात आलेल्या ‘सेवा पर्वा’ अंतर्गत ‘नमो युवा रन’ हा उपक्रम देशभरात विविध ठिकाणी राबवला जात आहे. या उपक्रमामध्ये युवक-युवती मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. ‘अमली पदार्थ मुक्त देशाच्या निर्मितीच्या सामूहिक मोहिमेमध्ये देशातल्या युवकांची शक्ती, ऊर्जा आणि दृढनिश्चय याचा उपयोग करणं’, हे या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘नमो युवा रन’ कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये राजधानीतले तरुण हजारोंच्या संख्येत सहभागी झाले होते.
मुंबईमध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप युवा मोर्चाच्या ‘नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत’ या दौडीला हिरवा झेंडा दाखवला. ‘नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त मुंबई’ या संकल्पनेवर आधारित या नमो रन मॅरेथाॅनमुळे आपली तरुणाई देशभक्तीला प्राधान्य देईल तसंच देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याच्या आणि देशाला आत्मनिर्भर करण्याच्या ध्यासानं प्रेरित होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.