सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. हरित आणि स्वच्छ उर्जेच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीद्वारे भारताला सौर उर्जा क्षेत्रात महत्त्वाचं स्थान मिळण्यासाठी केलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढावा…
हवामान बदलांवरच्या उपायांना पाठिंबा देण्यापासून ते हरित उर्जेपर्यंत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून आणली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रधानमंत्री मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकोइस ओलांद यांनी आंतरराष्ट्रीय सौर करार केला होता. या आघाडीनुसार सौर उर्जा निर्मिती क्षेत्रात २०३०पर्यंत एक हजार डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी हा जगासाठी एक मोठा आशेचा किरण म्हणून उदयाला आल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी नवी दिल्ली इथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या पहिल्या संमेलनाच्या उद्घाटनावेळी केलं होतं.
दक्षिण आशियापासून आफ्रिका आणि युरोपपर्यंतच्या देशांना सौर संसाधनाच्या माध्यमातून जोडणं आणि, अल्प विकसित देश आणि विकसनशील देशांची उर्जेची मागणी पुरवतानाच कार्बन उत्सर्जनाची मर्यादा कमी करण्याचा या आघाडीचा उद्देश आहे.