ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचं काल पुणे इथे त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेली ५० वर्षं मेहेंदळे यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतलं होते. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्रजीत साहित्यलेखन केलं आहे. त्यांनी शिवाजी झाला नसता तर, टिपू ॲज अ वॉर, शिवाजी लाईफ अँड टाईम, शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. सध्या त्यांचे दुसऱ्या महायुद्धावरच्या पुस्तकाचे काम सुरू होतं. निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गजानन मेहेंदळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मेहेंदळे यांचं लेखन हे प्रामुख्याने शिवरायांच्या युद्धशास्त्रावर आधारित होतं, शिवचरित्र इंग्रजीत लिहून त्यांनी दिलेलं योगदान निश्चितच मोठं असल्याचं मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणाले आहेत.
Site Admin | September 18, 2025 1:07 PM
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचं निधन
