केरळचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही एस अच्युतानंदन यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते १०१ वर्षांचे होते. गेल्या महिनाभरापासून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीपासून अच्युतानंदन यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. केरळमधे कम्युनिस्ट पक्ष लोकांपर्यंत नेण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. केरळच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेल्या १९४५-४६ च्या पुन्नप्रा-वायलर संघर्षाचं नेतृत्व व्ही एस अच्युतानंदन यांनी केलं होतं. त्यांनी दोन वेळा विरोधी पक्षनेते पद तर २००६ ते २०११ या काळात मुख्यमंत्रीपद भूषवलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तर अच्युतानंदन हे त्याग आणि संघर्षाच्या परंपरेचं प्रतीक होते अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी आदरांजली वाहिली आहे.