‘सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५’ लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत ‘सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५’ सादर केलं. भारतीय शेअर बाजाराशी संबंधित सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून त्यामध्ये सुधारणा करणं, हे या विधेयकाचं  उद्दिष्ट आहे. हे विधेयक पुढल्या छाननीसाठी आर्थिक विषयावरच्या संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव सीतारामन यांनी मांडला. विधेयक मांडण्यापूर्वी काँग्रेसचे मनीष तिवारी आणि द्रमुकचे अरुण नेहरू यांनी विधेयक मांडायला विरोध केला होता. 

 

आदिवासी समाजाच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी देशभरात ४४० एकलव्य आदर्श निवासी शाळा कार्यरत असल्याचं आदिवासी कल्याण मंत्री जुआल ओराम यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. सरकारने ६३ हजार आदिवासी गावांचा विकास करण्यासाठी एकूण ८० हजार कोटी रुपये खर्चाचं धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलं असून, विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांच्या उन्नतीसाठी पीएम-जनमन योजना सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

हवाई मार्गाने देशात प्रादेशिक दळणवळण वाढवण्यासाठी सुरू केलेल्या ‘उडान’ योजने अंतर्गत, देशभरात विमानतळांचं जाळं निर्माण झाल्याचं नागरी विमान विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते. याशिवाय आज लोकसभेत नियम १९३ अंतर्गत राजधानी दिल्ली परिसरातल्या प्रदूषणावर चर्चा होणार आहे. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा, कनिमोळी करुणानिधी आणि बांसुरी स्वराज, हे सदस्य चर्चेला सुरुवात करतील.