राज्यभरातील सुमारे सहा हजार अंशत: अनुदानित शाळांना अनुदान मिळावे, यासाठी गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षक आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात हजारो शिक्षक एकत्र आले असून त्यांनी आंदोलन सुरू केले. अनुदान मिळेपर्यंत मैदान सोडणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे. राज्य सरकारने या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप निधीची तरतूद न केल्याने हे आंदोलन सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. तुमच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारशी संवाद साधू आणि प्रश्न सोडवून घेऊ, असं आश्वासन त्यांनी शिक्षकांना दिलं.
या विषयावर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होणार असून त्यात त्यावर तोडगा काढण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली, याबाबतचा प्रश्न विजय देशमुख यांनी उपस्थित केला होता. राज्यातल्या अल्पसंख्य शाळांचा दर्जा मिळवण्यासाठी गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनुसार एक समिती स्थापन करून राज्यव्यापी तपासणी मोहीम राबवण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली, याबाबतचा प्रश्न गजानन लवटे यांनी उपस्थित केला होता.