शालेय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढच्या शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी घेतल्या जाणार आहेत. राज्य सरकारनं या निर्णयाला काल मान्यता दिली. सध्या या परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेतल्या जातात. चालू शैक्षणिक वर्षात ठरलेल्या वेळापत्रकानुसार या परीक्षा होतील. त्याबरोबरच, शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करायचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे.
इयत्ता चौथीसाठी प्रति महिना ५०० रुपये याप्रमाणे दरवर्षी पाच हजार रुपये, तर इयत्ता सातवीसाठी प्रति महिना ७५० रुपये याप्रमाणे दर वर्षी ७ हजार ५०० रुपये इतक्या रकमेला सरकारनं मंजुरी दिली. या दोन्ही शिष्यवृत्तींचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षांचा राहील, असं या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयात नमूद केलं आहे.