स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. सावित्रीबाई फुले यांनी सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. समता, न्याय आणि करुणा या मूल्यांप्रती त्यांची अतूट बांधिलकी होती, समाजातल्या वंचित आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी त्यांनी केलेलं कार्य प्रेरणादायी आहे, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आलं. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तर बीड शहरात अभिवादन रॅली काढण्यात आली. नांदेड इथंही जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. परभणीत पूर्णा तालुक्यात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले आणि जिजामाता यांच्या वेशभूषा साकारून त्यांचा जीवनपट सादर केला.