ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं आज दुपारी अडीच वाजता मुंबईत निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मूत्रपिंड निकामी झाल्याने आज दुपारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१९७२ मधे पुण्याच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेमधून अभिनय क्षेत्रात आलेले सतीश शहा यांच्या अनेक भूमिका गाजल्या. दूरदर्शनवर आलेल्या त्यांच्या ये जो है जिंदगी या मालिकेत विविध रंगी भूमिकांनी ते रसिकांच्या मनात घर करुन राहिले. जाने भी दो यारो या विनोदी चित्रपटातली त्यांची भूमिकाही संस्मरणीय ठरली. हम आपके है कौन, हम साथ साथ है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका आजही रसिकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतला त्यांचा काहीसा भोळा इंदू लोकांना प्रचंड भावला.
ज्येष्ठ विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सतीश शहा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयातून साकारलेल्या भूमिकांच्या रुपाने ते रसिकांच्या मनात चिरंतन वास करतील असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.