देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती उद्या आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांच्या विलीनीकरणाची प्रक्रीया कणखरपणे पूर्ण करणारे लोहपुरुष सरदार पटेल भारताच्या एकतेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा शतकोत्तर सुवर्णजयंतीचं औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत.
गुजरातमधे केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या स्मारकापाशी प्रजासत्ताक दिन संचलनाच्या धर्तीवर एकता संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. या संचलनात विविध राज्यांची पोलिस दलं, घोडदळ, उंटदळ, इत्यादी सहभागी असतील.
या संचलनात एकतेचा धागा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे. या महोत्सवात येत्या ७ आणि ८ नोव्हेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमातही महाराष्ट्राच्या लोकपरंपरा दाखवणारं १५ ते २० कलाकारांचं सादरीकरण असेल.
राज्यात ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात भारत पर्वा निमित्त विविध उपक्रम होणार असून त्यात युवकांनी भाग घ्यावा असं आवाहन राज्यशासनानं केलं आहे. यात पदयात्रा, निबंध वादविवाद स्पर्धा, चर्चासत्र, पथनाट्य अशा विविध आविष्कारातून सरदार पटेल यांच्या जीवनकार्याची ओळख करुन दिली जाईल आणि या लोहपुरुषाला अभिवादन करण्यात येईल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पाटणा इथं पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. येत्या १ नोव्हेंबर पासून १५ नोव्हेंबर पर्यंत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी म्हणजेच जनजातीय गौरव दिनापर्यंत भारत पर्व साजरं केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.