भारतीय स्वातंत्र्यानंतर देशाला एकसंध राखण्यात आणि आजच्या भारताच्या निर्मितीत सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतिनिमित्त नवी दिल्लीत आयोजित रन फॉर यूनिटीला त्यांनी आज प्रारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र एकता दौड, पदयात्रासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंत्रालयात मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केलं. तसंच दिवंगत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर इथल्या एकता दौडला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली.
परभणी शहरात आज भाजपच्या वतीनं एकता दौड आयोजित केली होती. जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डिकर यांनी गोमातेची पूजा करून एकता दौडचा प्रारंभ केला. परभणी पोलिसांच्या वतीनं कृषी विद्यापीठ गेट ते पोलीस कार्यालय अशी दौड घेण्यात आली.
नंदुरबार शहरातही एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं.
हिंगोली पोलिसांनीही एकता दौडचं आयोजन करून एकतेचा संदेश दिला. यवतमाळमध्ये क्रीडा मंत्रालय, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी यांनी एकत्रितपणे युनिटी मार्चचं आयोजन केलं होतं.
छत्रपती संभाजीनगर इथे एकता पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. तिचा समारोप राज्याचे इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झाला.
नांदेड, सोलापूर, धुळे जिल्ह्यातही तसंच नवी मुंबईत बेलापूर इथं एकता दौडसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
 
									 
		 
									 
									 
									 
									