विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी संघटित होऊन स्वतःला समर्पित करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या एकता नगर इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभात ते बोलत होते. २०१४ पासून सरकारनं नक्षलवाद आणि माओवादावर निर्णायक आणि शक्तिशाली प्रहार केला आहे. २०१४ पूर्वी देशभरातले जवळपास शंभर जिल्हे माओवादी कारवायांनी प्रभावित होते, पण आज ही संख्या अकरापर्यंत खाली आली आहे. तर, फक्त तीन जिल्हे नक्षलप्रभावी आहेत, असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
देश कमकुवत करणाऱ्या सर्व विचार किंवा कृती प्रत्येक नागरिकाने नाकारायला हवी, ही काळाची गरज असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या दृष्टिकोनाला मूर्त रूप देत ५५०हून अधिक संस्थानं एकत्र करून अशक्य वाटणारं काम साध्य केलं, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देशभरात सुरू असलेल्या एकता दौडमध्ये कोट्यवधी भारतीयांचा उत्साह पाहून प्रधानमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री मोदी यांनी दिवसाची सुरुवात स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष्पांजली अर्पण करून केली. यावेळी त्यांनी एकता दिनाची शपथ घेतली, तसंच भव्य एकता दिन संचलनाचं निरीक्षण केलं. या संचलनामध्ये बीएसएफ, सीआरपीएफ आणि विविध राज्य पोलीस दलांच्या तुकड्या सहभागी झाल्या होत्या. या संचलनात विविधतेून एकता या संकल्पनेवर दहा चित्ररथही सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश होता.
 
									 
		 
									 
									 
									 
									