December 25, 2025 1:51 PM | PM Modi | sansad khel

printer

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा खासदार क्रीडामहोत्सवातल्या खेळाडूंशी संवाद

संसद खेल महोत्सव देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून खेळामुळे जय-पराजयाच्या पलीकडे जात तरुणांमधे खिलाडूवृत्ती रुजत असल्यामुळे सक्षम आणि शिस्तबद्ध तरूण घडत आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. संसद खेल महोत्सवाचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. हेच तरूण पुढे राष्ट्र उभारणीत योगदान देणार आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.

संसद खेल महोत्सवामुळे देशाला हजारो खेळाडू मिळाले असून या महोत्सवाची व्याप्ती आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. २०३० मधे भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जाणार असून २०३६ ला ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. या स्पर्धांमधे जे सहभागी होतील ते आता दहा ते पंधरा वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिभेला वाव देणं गरजेचं आहे. संसद खेल महोत्सव अशा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देतो असं प्रधानमंत्री म्हणाले. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय हेही दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते.