संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी विविध कारणांवरून गदारोळ केल्यामुळे आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. सकाळी अकरा वाजता राज्यसभेचं कामकाज सुरु होताच उपाध्यक्ष हरिवंश यांनी शून्य प्रहर पुकारण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधकांनी बिहारमधल्या मतदारयाद्या पुनरिक्षणासह इतर मुद्दे मांडण्यास सुरुवात केली.
विविध पक्षांकडून पाच मुद्द्यांवर २९ स्थगन प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती उपाध्यक्षांनी दिली. यापैकी १८ प्रस्ताव न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर चर्चा होऊ शकत नसल्याचं ते म्हणाले. यावर विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. अधिवेशनाचा कालावधी वाया जात असल्याचं सांगत उपाध्यक्षांनी विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण गदारोळ कायम राहिल्यानं दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलं .
लोकसभेतही असंच चित्र दिसून आलं. विरोधक नियोजित पद्धतीनं गदारोळ करत असल्याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी नापसंती व्यक्त केली. करोडो रुपये वाया जात असल्याचं त्यांनी सांगितलं.