December 12, 2025 1:42 PM | Sansad

printer

संसदेच्या दोन्ही सभागृहात संसदेवर झालेल्या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली

लोकसभेत आज कार्तिगाई या दीपप्रज्वलनाच्या प्रथेवरून द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब झालं. आज सकाळी कामकाज सुरु झाल्यावर सदनाच्या सदस्यांनी माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांना आदरांजली वाहिली.

 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाला शिवराज पाटील यांच्या निधनाची माहिती दिली. शिवराज पाटील यांनी महाराष्ट्राच्या लातूर संसदीय मतदारसंघातून सलग सात वेळा सभागृहाचे सदस्य म्हणून काम केलं. त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारांची सुरुवात झाल्याचं ते म्हणाले. 

 

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी आज १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली. या हल्ल्याच्या वेळी संसदेच्या सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अदम्य साहस दाखवून दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावल्याचं लोकसभेत, सभापती ओम बिर्ला म्हणाले. राज्यसभेत, अध्यक्ष सी पी राधाकृष्णन म्हणाले की, १३ डिसेंबर २००१ हा इतिहासातला एक काळा दिवस होता, या हल्ल्यात देशानं आपले वीर गमावल्याचं ते म्हणाले.  

 

यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. मात्र, कामकाज सुरू असताना द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज तहकूब झालं.