दूरसंचार विभागाच्या ‘संचार साथी’ उपक्रमाने, हरवलेले आणि चोरीला गेलेले 6 लाखांपेक्षा जास्त मोबाईल हँडसेट परत मिळवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या यशामुळे नागरिकांचा डिजिटल प्रशासनावरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. ‘डिजिटल बाय डिझाइन’ या संकल्पनेवर आधारित संचार साथी उपक्रमाने मोबाईल चोरीला आळा घालण्यातमहत्वाचं योगदान दिलं असून, ही सुविधा दर मिनिटाला एक मोबाईल फोन परत मिळवत आहे, असं दूरसंचार मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेल्या या प्रगत व्यासपीठाने गेल्या ८ महिन्यांमध्ये हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात ६१ टक्के इतकी सातत्यपूर्ण वाढ दर्शवल्याचं यात म्हटलं आहे. नागरिकांनी डिजिटल सुरक्षिततेची खात्री मिळवण्यासाठी, आपल्या हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल हँडसेटची तक्रार, संचार साथी पोर्टल आणि मोबाईल ऍपवर करावी, असं आवाहन दूरसंचार मंत्रालयानं केलं आहे.