संचार साथी या ऍप्लिकेशनद्वारे हेरगिरी करणं शक्य नसून अशा प्रकारे कोणतीही हेरगिरी होणार नाही, अशी ग्वाही मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकसभेत दिली. वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार हे ऍप्लिकेशन सक्रिय किंवा निष्क्रीय करू शकतात तसंच त्यांच्या फोनमधून ते हटवू देखील शकतात. सायबर फसवणुकीपासून संरक्षणासाठी या ऍप्लिकेशनची निर्मिती झाल्याचं शिंदे आपल्या उत्तरात म्हणाले. या ऍपच्या माध्यमातून दीड कोटी फसव्या मोबाईल जोडण्या तोडण्यात आल्या असून चोरीला गेलेले २६ लाख मोबाईल फोन शोधण्यात आल्याचंही शिंदे म्हणाले.
शालेय स्तरावर नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी अटल नवोन्मेष धोरणांतर्गत सरकार देशातल्या शाळांमध्ये ५० हजार नवीन अटल टिंकरिंग प्रयोगशाळांची स्थापना करणार आहे, असं माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात सांगितलं. समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रम आणि प्रधानमंत्री श्री ही धोरणं एकमेकांशी संबंधित आहेत, असं प्रधान यावेळी म्हणाले.