सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखणं आणि ते आणखी वाढवणं आवश्यक झालं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. भारत समन्यायी, संतुलित आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेसाठी आग्रही असल्याचं स्पष्ट करत सुधारित बहुपक्षवाद ही काळाची गरज असल्याचं डॉ. जयशंकर यांनी नमूद केलं.
सध्या भारत दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी डॉ. जयशंकर यांनी चर्चा केली, त्यावेळी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला भारताचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक आणि व्यापारी संबंध, तीर्थयात्रा, उभय देशांच्या नागरिकांमधले परस्पर संबंध, नदीच्या पाण्याबाबत माहितीचं आदानप्रदान यासह इतर अनेक व्यापक मुद्द्यांवर चर्चा झाली.