शांघाय सहकार्य संघटनेनं अर्थात एससीओनं दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकीवादाच्या मुद्द्यांवर तडजोड न करता कठोर भूमिका घ्यावी, असं आवाहन भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल चीनमधील तियानजिन इथं झालेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत केलं. पहलगाममधील दहशतवादी हल्ला धार्मिक फूट पाडण्याच्या उद्देशानं जम्मू आणि काश्मीरची पर्यटन अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी करण्यात आला.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं या घटनेचा निषेध केला असून, या निंदनीय कृत्याचे गुन्हेगार, वित्तपुरवठादारांना जबाबदार धरण्याची गरज अधोरेखित केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. सध्या आर्थिक अस्थिरता वाढत असून, भारतानं स्टार्टअप आणि नवोपक्रमापासून ते पारंपरिक औषधनिर्मिती आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांपर्यंतच्या क्षेत्रात अनेक पुढाकार घेतले आहेत. एससीओमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी अधिक व्यापार, गुंतवणूक आणि देवाणघेवाण आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. एससीओ क्षेत्रात खात्रीशीर वाहतूक नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉरला गती देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.