परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि एससीओ, अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर सदस्यांची भेट घेतली. डॉ. जयशंकर आपल्या दोन दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी काल बीजिंग मध्ये पोहोचले.
ते आज तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहतील. डॉ. जयशंकर यांनी काल बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या बरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. चीनकडून हायड्रॉलिक डेटाची तरतूद पुन्हा करण्यासह, सीमापार नद्यांबाबत सहकार्य, प्रतिबंधात्मक व्यापार विषयक उपाययोजना आणि आर्थिक सहकार्यातले अडथळे, हे मुद्दे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
भारत, रशिया, इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारूस हे देश शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य असून चीनकडे अध्यक्षपद आहे.