रशियासोबतच युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकनं युक्रेनला १५ वर्षांसाठी सुरक्षेची खात्री द्यायची तयारी दाखवली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची काल फ्लोरिडामध्ये भेट घेतल्यावर ते बोलत होते. ही खात्री युक्रेनला देण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची मंजुरी आवश्यक असेल. युक्रेननं ५० वर्षाच्या सुरक्षेची खात्री मागितली आहे. ट्रम्प आणि युरोपियन देशांचे नेते सुरक्षेच्या अटींना तयार झाले तर रशियासोबत चर्चा करू असं झेलेन्स्की म्हणाले. युद्ध थांबवण्यासाठी दोन महिन्यांनी शस्त्रसंधी आवश्यक असून डोनबास भागात मुक्त आर्थिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी चर्चा सुरू आहेत.
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या दिशेने या चर्चेत महत्त्वाची प्रगती झाली आहे आणि या शांतता चर्चा काही आठवड्यात पूर्ण होतील, असं ट्रम्प यांनी सांगितलं. यासंदर्भात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युरोपियन नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, रशियानं युक्रेनच्या डोनेस्क प्रांतावर केलेल्या हल्ल्यात १ युक्रेनी नागरिक जखमी झाला असून अन्य ५ नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळं डोनेस्क मधल्या १८ मुलांसह १०८ नागरिकांना स्थलांतरित करणं भाग पडलं आहे.