रशियानं काल रात्री युक्रेनवर संयुक्त क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये एक जण ठार झाल्याचं वृत्त आहे. युक्रेनचे ७७ ड्रोन पाडल्याचं रशियानं म्हटलं आहे. युक्रेनमधल्या क्रेमेन्चुक शहरातल्या पायाभूत सुविधांवर झालेल्या या हल्ल्यांमुळे वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला. क्रेमेन्चुक हे युक्रेनमधलं सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांपैकी एक महत्त्वाचं ठिकाण असून ते एक औद्योगिक केंद्र आहे.
युक्रेन आणि त्याच्या पाश्चिमात्य मित्रराष्ट्रांच्या अनुसार युक्रेनच्या वीजजाळ्याला ठप्प करायचा रशियाचा प्रयत्न असून नागरिकांना सलग चौथ्या हिवाळ्यात उष्णता, प्रकाश आणि नळाचं पाणी मिळू नये, यासाठीचे हे रशियाचे प्रयत्न आहेत, असा आरोप युक्रेननं केला आहे.
युक्रेनियन अधिकाऱ्यांनी याला ‘थंडीचं अस्त्रं’ असं संबोधलं आहे. एकीकडे संघर्षविरामाच्या चर्चा सुरू असताना दोन्ही देशांकडून हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राजदूत स्टिव्ह विटकॉफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेच्या प्रयत्नांना आपण साथ देऊ असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.