रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी १५ मे पर्यंत विनाविलंब वाटाघाटी सुरू करायचं आवाहन केलं आहे. प्रस्तावित चर्चा तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये व्हावी, असं राष्ट्रपती पुतिन यांनी दूरचित्रवाणीवरच्या भाषणात सांगितलं. यामध्ये दोन्ही देश नवीन युद्धबंदी करारावर सहमत होऊ शकतात, अशी शक्याताही पुतीन यांनी व्यक्त केली आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्याशी यावर चर्चा करणार असल्याचं पुतीन यांनी सांगितलं आहे. युक्रेननं मात्र, या प्रस्तावावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियाच्या तीन युद्धबंदी प्रस्तावांना युक्रेन प्रतिसाद देत नसल्याचा आरोप पुतिन यांनी केला आहे.
दरम्यान, रशियासोबत ३० दिवसांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शवण्यासाठी ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टारमर आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह युरोपीय नेत्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रस्तावित युद्धबंदीमध्ये जमीन, समुद्र आणि हवाई संघर्ष थांबवायचा समावेश असेल. रशियाने जर युद्धबंदीचं पालन केलं नाही, तर ऊर्जा आणि बँकिंग क्षेत्रांसह रशियावर निर्बंध वाढवायची धमकी युरोपीय नेत्यांनी दिली आहे.