रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशातल्या संघर्षाची मूळ कारणं दूर होईपर्यंत आणि शांतता करारांना औपचारिक मान्यता मिळेपर्यंत युक्रेनमध्ये आपली लष्करी मोहीम सुरु ठेवणार असल्याचं रशियानं म्हटलं आहे. परस्पर देशांमध्ये औपचारिक आणि कायमस्वरपी करार होईपर्यंत कोणत्याही बिनशर्त युद्धबंदीला रशियाचा नकार असेल, असं रशियन स्टेट ड्युमाच्या संरक्षण समितीचे अध्यक्ष एंड्री कार्तापोलोव यांनी स्पष्ट केलं. रशिया पुन्हा कोणत्याही भ्रमांना बळी पडणार नसून मॉस्को त्यांचं आक्रमण सुरूच ठेवेल, असं त्यांनी सांगितलं. पाश्चिमात्य देशांनी मॉस्कोला दिलेल्या पोकळ आश्वासनांबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियाचे राजदूत व्हॅसिली नेबेन्झिया यांनीही त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. कीव जर कायमस्वरूपी तोडग्यासाठी ठोस पावलं उचलणार असेल तरच मॉस्को तत्वतः युद्धबंदीचा विचार करायला तयार आहे, असं ते म्हणाले. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर ज़ेलेंस्की यांना लोकशाही, जबाबदारी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागू नये म्हणून युक्रेन जाणूनबुजून संघर्ष लांबवत असल्याचा आरोप नेबेन्झिया यांनी केला. तसंच युरोपातले काही घटक अमेरिकेची दिशाभूल करून शांतता चर्चा स्थगित करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला.