रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी अमेरिकेनं दिलेला प्रस्ताव युक्रेननं फेटाळला, तर रशियाचं सैन्य आगेकूच करत राहील, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला. रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या प्रस्तावाबद्दल अद्याप अमेरिकेशी तपशीलवार चर्चा झालेली नाही, मात्र आपल्याला त्याची प्रत मिळाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. युक्रेनचा या प्रस्तावाला विरोध असला, तरीही, रशियाचं सैन्य युक्रेनमध्ये आगेकूच करत आहे, याची कल्पना युक्रेन किंवा युरोपीय देशांना नसून शांतता पुनर्स्थापित होईपर्यंत ही आगेकूच सुरू राहील, असंही पुतीन यांनी सांगितलं.
दरम्यान, युक्रेनसमोर स्वतःची प्रतिष्ठा गमावणं किंवा अमेरिकेचा पाठिंबा गमावणं असे दोनच पर्याय असल्याचं मत युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केलं. त्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा शांतता प्रस्ताव स्वीकारण्यासाठी युक्रेनला एका महिन्याची मुदत दिली होती. नाटोबद्दल रशियाच्या मागण्यांना पाठिंबा, तसंच रशियाच्या ताब्यात असलेल्या भूभागांना मान्यता देण्याच्या तरतुदी या प्रस्तावात आहेत.