गाझा पट्ट्यातली हिंसा थांबवण्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला अद्याप यश मिळालं नसल्याबाबत रशियाने खेद व्यक्त केला आहे. रशियाच्या परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे, की या संदर्भात पुढे आलेल्या कोणत्याही प्रस्तावावर अमेरिका नकाराधिकाराचा वापर करीत असल्याने हे शक्य झालेलं नाही.
गाझामधे शस्त्रसंधी आणि मानवतावादी सहाय्याकरता प्रवेश याविषयीचा ठराव सुरक्षापरिषदेत गेल्या गुरुवारी पुन्हा एकदा अमेरिकेच्या नकाराधिकारामुळे बारगळला. त्याबाबत रशियाने ही प्रतिक्रीया दिली आहे. ७ जुलै २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर या प्रदेशात हिंसेला तोंड फुटलं. या हल्ल्याचा आपण निषेध करतो मात्र त्या घटनेचा वापर पॅलेस्टिनी नागरिकांना शिक्षा देण्यासाठी आणि पश्चिम आशियात युद्ध धगधगतं ठेवण्यासाठी होऊ नये असं रशियाने म्हटलं आहे.